Osage — Middle Waters
सत्य घटनांवर आधारित
लेखक: संदीप का.
लहानपणी आपण ज्यांना “रेड इंडियन” म्हणून वाचायचो, ते अमेरिकेचे मूळ रहिवासी. त्यांच्यातली एक जमात म्हणजे ओसेज. अमेरिकन सरकारनं त्यांना ओक्लाहोमा राज्यातली जमीन दिली, आणि १९०० च्या सुमारास त्या जमिनीखाली तेल सापडलं. तेलाच्या कमाईत प्रत्येक ओसेज माणसाचा हक्काचा वाटा होता. त्याला headright म्हणतात, आपल्याकडच्या वतनातल्या वाट्यासारखा. अमेरिकेतली न्यूजपेपर्स त्यांना जगातली सर्वात श्रीमंत जमात म्हणायला लागली. त्याच काळात ओक्लाहोमातल्या ओसेज काउंटीमध्ये, म्हणजे फेअरफॅक्स, ग्रेहॉर्स आणि पावहुस्का या गावांत, ओसेज लोकांच्या घरांमध्ये एकामागून एक मृत्यू होऊ लागले. ही कथा त्या खऱ्या घटनांवर आधारित आहे. मॉली बर्कहार्ट आणि तिचं कुटुंब खरं होतं. त्यांचे विचार आणि घरातले संवाद मात्र माझे कल्पित आहेत.
* * *
भाग १ : कॉफी आणि कागद
माझ्या घरातली माणसं एकामागून एक गेली.
तेव्हा आम्हाला ते योगायोग वाटले.
आता तसं वाटत नाही.
मिनी आजारी पडून गेली. अॅनाला कुणीतरी गोळी घातली. आई हळूहळू विरत गेली. रिटाचं घर रात्री उडालं. पाच वर्षांत चौघी. आणि प्रत्येक वेळी मी जवळच होते.
पण आधी तुम्हाला आमचं घर सांगते. म्हणजे आम्ही कोण होतो ते कळेल.
आईच्या पावलांचा आवाज मला अजून ऐकू येतो. पहाटे अंधार असायचा, थंडी हाडात शिरायची, आणि ती पावलं हळूच स्वयंपाकघराकडे जायची. मग स्टोव्ह पेटायचा, कॉफीचा वास यायचा, आणि आम्ही बहिणी रजईत आणखी घुसायचो.
आईची कॉफी रोज थोडी जळायची. भांडं म्हणजे ते जुनं, निळ्या कडेचं, ज्याचं झाकण आम्ही कधीच शोधलं नाही. ते स्टोव्हवर विसरून ती दुसऱ्या कामाला लागायची. कधी कोंबड्यांना दाणे टाकायला, कधी शेजारच्या बाईला काहीतरी सांगायला.
“आई, पुन्हा जळली,” अॅना म्हणायची.
“जळली तर जळली. गरम आहे ना? पी.”
बास. त्या घरात एवढंच बोलणं. तेच आता आठवत राहतं.
गोरे आम्हाला “इंडियन” म्हणतात. त्यांच्यातला कुणी भारताचा रस्ता शोधायला निघाला आणि चुकून इकडे येऊन थांबला, म्हणून आम्ही इंडियन. चूक त्याची, नाव आमच्या डोक्यावर. आम्ही स्वतःला म्हणतो वाझाझे. सिस्टर्सनी शाळेत सांगितलं, याचा इंग्रजीत अर्थ Middle Waters. आमच्या आजीला इंग्रजीचा एक शब्द येत नव्हता. पण आमच्या माणसांना सरकारनं कसं उठवलं, ते तिला पाठ होतं. आधी मिसुरीतून, मग कन्सासमधून, आणि शेवटी इकडे, ओक्लाहोमात, अमेरिकेच्या मधल्या टेकड्यांवर आणून सोडलं.
“इथं तरी राहू द्या रे बाबा,” ती म्हणायची. “ही जागा आम्ही विकत घेतलीय. पैसे देऊन.”
खरंच होतं. १८७२ मध्ये. तरी कागदावर तिला “रिझर्व्हेशन” म्हणतात, म्हणजे आमच्यासाठी आखलेली जागा. जणू आम्ही कुणाच्या घरी पाहुणे आहोत.
मग एक दिवस जमिनीखाली तेल निघालं.
मला नेमकं कधी ते आठवत नाही, मी लहान होते. पण लोकांचे चेहरे बदलले, ते आठवतं. दुकानदार दारात येऊन हसायला लागला. कारवाला आधीच दार उघडून उभा राहायचा. मी ब्रेडसाठी पीठ आणायला निघालेली असायचे, पण तो असा वागायचा जणू राणी आलीय. नाक मुरडणारे गोरे लोक एकदम “मॅडम, मॅडम” करायला लागले. आम्हाला नाही. आमच्या नावावरच्या कागदाला.
तो कागद म्हणजे headright. जमिनीचा तुकडा सगळ्यांना मिळाला होता, पण खाली जे निघायचं ते आमच्या सगळ्यांचं. त्यातला हिस्सा प्रत्येकाच्या नावावर लिहिलेला. माझ्या नावावर होता. आईच्या, अॅनाच्या, मिनीच्या, रिटाच्या. एका घरात एवढे हिस्से. मग लोकांची नजर कुठं जाणार?
तेव्हा मला वाटायचं, ते कौतुकानं बघताहेत.
अॅना एकदा रागानं म्हणाली, “आपलेच पैसे. आणि मागायला जायचं त्या चष्मेवाल्याकडे. आपण काय लहान पोरं आहोत?”
तो चष्मेवाला म्हणजे आमचा गार्डियन. आमच्यापैकी पुष्कळांच्या पैशावर सरकारनं असा एक गोरा माणूस नेमला होता, लहान मुलाचे पैसे जसा कुणी काका सांभाळतो. मी गेले की तो चष्म्याच्या वरून बघायचा आणि म्हणायचा, “मिसेस बर्कहार्ट, थोडं थांबा.”
किती थांबायचं, ते कधी सांगितलं नाही. मी थांबले. बाकीचं पुढे येईल. आधी मिनी.
* * *
भाग २ : मिनी
मिनी माझ्या सगळ्या बहिणींत शांत होती. अॅना बोलायची, रिटा हसायची, आणि मिनी ऐकत बसायची. घरात कुणाचं भांडण झालं की सगळे तिच्याकडे बघायचे, ती काय म्हणते. ती काहीच म्हणायची नाही, पण तिच्याकडे बघून भांडण संपायचं.
तिचे हात नेहमी थंड असायचे. मी लहानपणी तिचे हात माझ्या गालावर धरायचे, ती हसायची. “अगं, तुला गरम वाटतं का?” “नाही, मला तुझे हात आवडतात.”
आणि तिला पेपरमिंटच्या गोळ्या फार आवडायच्या. तिच्या पर्समध्ये, उशीखाली, कोटाच्या खिशात, सगळीकडे. एकदा अॅनानं तिची एक गोळी चोरली तर मिनी इतकी रडली की आईला तिला दुकानात पाठवावं लागलं.
१९१८ ची गोष्ट आहे. माझं लग्न होऊन एक वर्ष झालं होतं. एलिझाबेथ जन्मली, आणि दोनच महिन्यांनी मिनीला आजार लागला.
आजार म्हणजे काय, ते आम्हाला कळलंच नाही.
तिला थकवा आला. सुरुवातीला तेवढंच. मग ती खाईनाशी झाली, तोंडात घास घातला की नकोसा वाटायचा. मग हळूहळू अंगावरचे कपडे ढगळ व्हायला लागले. मी तिला भेटायला गेले तेव्हा ती दारात उभी होती, आणि मला वाटलं तिनं आईचा कोट घातलाय. पण तो तिचाच कोट होता.
“तू काही खात नाहीस का?” मी विचारलं.
“खाते ग. पण राहात नाही.”
“काय राहात नाही?”
“अन्न. जाऊ दे, दोन दिवसांत ठीक होईन.”
दोन दिवस गेले. दोन महिने गेले.
आई रोज तिच्यासाठी वेगळं सूप करायची. चिकनचं, बीफचं, भाज्यांचं. मिनीनं एक चमचा प्यायला की ती आईकडे बघून हसायची, “छान आहे आई,” आणि मग ते तसंच राहायचं. आईनं मग मोठ्यांदा काही बोलणं सोडलं, ती फक्त पाहात बसायची.
अॅना डॉक्टरवर चिडायची. “डॉक्टर काय करतोय? येतो, नाडी बघतो, ‘होईल ठीक’ म्हणतो आणि पैसे घेऊन जातो. आपल्याकडे पैसे आहेत म्हणून, नाहीतर कधीच नाही आला असता.”
“अॅना,” आई म्हणायची.
“मी खरं बोलतेय आई.”
पण ती खरी होती. पहिल्यांदा डॉक्टर खोकल्याचं औषध घेऊन आला. दुसऱ्यांदा पोटाचं. तिसऱ्यांदा झोपेचं. चौथ्यांदा तो औषधाची बाटली टेबलावर ठेवून बराच वेळ काहीच बोलला नाही. मग मला बाजूला घेऊन म्हणाला, “मिसेस बर्कहार्ट, मला खरंच कळत नाही. ती... सुकत चाललीय.”
“का?” मी विचारलं.
त्यानं खांदे उडवले.
त्या दिवसांत काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या, पण मी त्या एकमेकांना जोडल्या नाहीत. आईकडे बँकेतले लोक पूर्वीपेक्षा जास्त यायला लागले. रस्त्यात अनोळखी माणसं थांबून मिनीची चौकशी करायची, “कशी आहे आता?” आणि अॅना पैशाच्या विषयावर आणखी जास्त चिडायला लागली.
रिटा त्यावेळी सगळ्यात लहान होती. ती दिवसभर मिनीजवळ बसायची. तिला पुस्तकं वाचायला आवडायची, ती मिनीला मोठ्यांदा वाचून दाखवायची. मिनी डोळे मिटून ऐकायची. एकदा रिटानं एक विनोदी गोष्ट वाचली आणि स्वतःच इतकी हसली की पुढचं वाचता आलं नाही. मिनी म्हणाली, “रिटा, तू हसतेस तोपर्यंत मला काहीच दुखत नाही.” रिटा वाचायची थांबली. मी दारातून बघत होते.
मिनी अधूनमधून योजना सांगायची. “मी बरी झाले की आपण चौघी टुल्साला जाऊ. नवीन हॅट घ्यायची. फोटो काढायचा.” आम्ही “हो हो” म्हणायचो.
अर्नेस्ट रोज आमच्यासोबत यायचा. तो माझा नवरा, तेव्हा नवरा म्हणून फार चांगला होता. डॉक्टरकडे जायचं तर तो गाडी आणायचा, मिनीला उचलून आत ठेवायचा. “किती हलकी झालीय हो,” तो मला हळूच म्हणायचा. एकदा मिनीनं त्याला विचारलं, “तू मॉलीची नीट काळजी घेतोस ना?” तो हसून म्हणाला, “ती माझी काळजी घेते.” मिनी हसली. हसताना तिच्या डोळ्यांभोवती बारीक सुरकुत्या पडल्या, इतकी ती थकली होती.
त्याचे काका, मिस्टर हेल, आमच्याकडे यायचे. गावात सगळे त्यांना “किंग” म्हणायचे. बँकेत त्यांचा मोठा हिस्सा, दुकानात हिस्सा, अगदी मेल्यावर दफनाची सोय करणाऱ्या दुकानातही. ते ओसेजांशी फार चांगलं वागतात असं सगळे सांगायचे. येताना कधी कधी फळं आणायचे. बोलताना नेहमी हसायचे. पण त्यांचे डोळे हसायचे की नाही, ते मला कधी समजलं नाही.
एकदा त्यांनी मिनीकडे बराच वेळ बघितलं. मग आईला म्हणाले, “लिझी, काही लागलं तर मला सांग.”
आई म्हणाली, “देवाची कृपा, तुम्ही आहात.” त्यांनी आईच्या खांद्यावर हात ठेवला.
एका पहाटे आईनं निरोप पाठवला. मी लगेच निघाले. एलिझाबेथला बाजूच्या बाईकडे सोडलं. आई मिनीच्या पलंगाच्या बाजूला बसली होती, शांत. रिटा खाली जमिनीवर, तिच्या पायाशी. अॅना खिडकीजवळ उभी होती, तोंडावर हात ठेवून.
“गेली,” आई म्हणाली.
स्टोव्ह विझला होता. खोली थंड होती. कुणी रडलं नाही. आम्ही सगळे तिच्याकडे बघत होतो, जणू ती अजून श्वास घेईल.
मी तिचे हात धरले.
थंड.
नेहमीसारखेच.
तिला चर्चमध्ये नेलं. सिस्टर्स आल्या. मिस्टर हेलही आले, मागे उभे राहिले, आणि जाताना आईच्या हातात काहीतरी ठेवून गेले. दोन-तीन नोटा. आई ती पाहात राहिली. “कशाला?” ती हळूच म्हणाली, पण ते जाऊन गेले होते.
मिनीची खोली चार दिवस कुणी उघडली नाही. आई मात्र दुसऱ्या दिवशी उठली, जणू कामावर निघाली आहे, आणि दिवसभर घरातली भांडी घासत राहिली. स्वच्छ भांडीसुद्धा.
त्या रात्री अॅना माझ्याकडे आली. “मॉली,” ती म्हणाली, “मला हे आवडलं नाही.” “काय?” “मिनीचं. ती कुणाला काही त्रास देत नव्हती. इतकी चांगली माणसं असं का मरतात?”
मी म्हटलं, “आजार अॅना.”
“कसला आजार? कुणालाच नीट माहीत नाही.”
मी तिला चहा दिला आणि सांगितलं, “झोप. उद्या पुन्हा बोलू.”
आम्ही कधी बोललो नाही.
मिनीची पेपरमिंटची डबी रिटानं घेतली. तिनं ती उशीखाली ठेवली. आईला कळल्यावर म्हणाली, “ठेव. पण खाऊ नकोस.” रिटा खात राहिली, एकेक. शेवटची गोळी तिनं कधी खाल्ली, ते मला माहीत नाही.
काही वर्षांनी, घरात उरलेल्या वस्तू मोजायला बसले, तेव्हा त्यात ती डबी नव्हती.
रिटा तेव्हा विचारत राहायची, “मिनी कधी येणार?” एकदा नाही, बरेच दिवस. तिला आम्ही काही उत्तर दिलं नाही.
* * *
भाग ३ : अॅना
अॅनाला शांत बसता येत नव्हतं.
चर्चमध्ये ती मागच्या बाकावर बसायची, म्हणजे हसलं तरी सिस्टर्सना दिसणार नाही. पंचवीस वर्षांची होती, आणि घरातली सगळ्यात मोठ्यांदा हसणारी. एकेकाळी एका गोऱ्या माणसाशी तिचं लग्न झालं होतं, आणि ते कसं संपलं हे तिनं कधी सांगितलं नाही. विचारलं की म्हणायची, “गेलं ते गेलं. पुढचं बघ.”
तिचं स्वतःचं घर होतं. तिच्या बोटांत तीन अंगठ्या असायच्या, हिऱ्यासारख्या दिसणाऱ्या. खऱ्या नव्हत्या. खरा हिरा तिनं वर्षभरापूर्वीच विकून पैसे उडवले होते. पण लोकांना काय समजतं? ओसेज बाई, बोटात चमकणारं काहीतरी, म्हणजे हिराच. अॅना त्याला हसून दुर्लक्ष करायची. “चमकतंय ना? बास.”
त्या काळात दारूवर बंदी होती. तरी अॅनाला ती कुठे मिळते, ते नेहमी माहीत असायचं. मी तिला किती वेळा सांगितलं. ती म्हणायची, “तू आई झाल्यापासून म्हातारी झालीस, मॉली.” मी म्हणायचे, “आणि तू कधी मोठी होणार?” ती जोरात हसायची.
अर्नेस्टचा धाकटा भाऊ बायरन तेव्हा आमच्या घरी येत-जात असे. अॅना त्याच्याशी भांडायची आणि मग त्याच्याच गाडीत बसून निघून जायची. मला ते कधी समजलं नाही. आमच्या घरातली मदतनीस मला म्हणाली होती, “अॅना म्हणते, बायरनशी कुणी चाळे केले तर त्या बाईला मारून टाकीन.” मी हसले.
जून महिन्यात तिचं लग्न ठरल्याचं ती मला सांगणार होती. अर्नेस्टला तिनं सांगितलं होतं, पण मला सांगायचं राहिलं. तो मला नंतर म्हणाला.
तो शनिवार मला नीट आठवतो.
मे महिन्याचा शेवट होता, गरम. जेम्स वर्षाचा, आणि एलिझाबेथ तीन वर्षांची, दोघं रडत होते. अॅना दुपारी आमच्या घरी आली. तिच्या तोंडाला दारूचा वास होता, पण ती हसत होती. बायरनशी तिचं काहीतरी भांडण झालं, मला ते कळलं नाही. मी तिला स्वच्छ कपडे दिले आणि म्हटलं, “आधी हे बदल.” तिनं बदलले.
“मॉली, तुझी ती निळी टोपी देतेस का?” ती म्हणाली.
“कशाला?”
“आज संध्याकाळी माझ्याकडे लोक येणार आहेत. जरा चांगली दिसेन.”
“उद्या परत दे. चर्चला घालायचीय मला.”
“दे ग, दे. उद्या देते.”
साडेचार-पाचच्या सुमारास बायरन आला. त्याची फोर्ड बाहेर उभी होती. अॅना टोपी घालून बाहेर गेली. मी जेम्सला कडेवर घेतलेलं होतं, हात हलवता आला नाही. ती गाडीतून हात हलवत गेली.
मी हात हलवला नाही.
रविवारी चर्चमध्ये अॅनाची जागा रिकामी होती. आई म्हणाली, “झोपली असेल.” सोमवारी मी अर्नेस्टला घेऊन तिच्या घरी गेले.
दार बंद. आत कोणी नाही.
खिडकीतून मला टेबलावर एक अर्धा रिकामा ग्लास दिसला. अर्नेस्ट खिडकीला कान लावून ऐकत होता. मग तो वळला. तो इतका शांत होता की मला दिलासा मिळाला.
“ती कुठेतरी गेली असेल, मॉली,” तो म्हणाला. “तू जाणतेस तिला.”
मी जाणत होते.
मंगळवार गेला. बुधवार गेला.
आईनं मिस्टर हेल यांना निरोप पाठवला. ते संध्याकाळी आले, दाराबाहेर बूट पुसून. त्यांचा आवाज मऊ होता. “लिझी, काळजी करू नको. मी स्वतः चौकशी करतो.”
“तुम्ही आहात ते चांगलं,” आई म्हणाली.
ते हसले. त्यांचे डोळे मात्र खोलीत सगळीकडे फिरत होते. आईकडे, माझ्याकडे, रिटाकडे, भिंतीवरच्या फोटोकडे. जणू काही मोजत होते.
आमचे लोक शोधायला निघाले. ओढ्यात, टेकड्यांवर, रस्त्याच्या कडेला. कुणाला काही दिसलं नाही.
शुक्रवारी, २७ तारखेला, पावहुस्का आणि फेअरफॅक्सच्या रस्त्याजवळच्या एका ओढ्यात कुणाला तरी तिचा मृतदेह सापडला.
कुणीतरी धावत येऊन सांगितलं. मी स्वयंपाकघरात होते. हातातला चमचा खाली पडला, आणि मग मला काही आठवत नाही. शेजारची बाई नंतर म्हणाली की मी ओरडले, आणि जेम्सनं घाबरून उलटी केली. मला त्यातलं काहीच आठवत नाही. फक्त तो चमचा.
मी तिला पाहायला गेले नाही. अर्नेस्ट गेला. तो परत आला तेव्हा त्याचा चेहरा पांढरा होता. “मॉली...” तो म्हणाला आणि पुढे बोलला नाही.
डॉक्टरांनी सांगितलं, डोक्याच्या मागे गोळी.
तिला ओळखलं ते तिच्या बोटांतल्या अंगठ्यांवरून. तीन अंगठ्या. हिऱ्यासारख्या दिसणाऱ्या.
खऱ्या नव्हत्या. ते फक्त आम्हाला माहीत होतं.
तिच्या पायात बूट नव्हते.
त्या दिवसांत माझ्यावर एक वेगळीच जबाबदारी आली. आमच्या घरात फक्त मलाच नीट इंग्रजी येत होतं, आणि माझा नवरा गोरा होता. त्यामुळे शेरीफ, डॉक्टर, कागदपत्रं, सगळं माझ्या हातात आलं. शेरीफनं मला खूप प्रश्न विचारले. अॅना कुणाबरोबर फिरायची? दारू पीत होती का? ती कुणाशी भांडायची?
एकही प्रश्न तिला कुणी मारलं, याचा नव्हता.
मला वाटलं, ते तपासाचा क्रम असेल.
अॅनाचं फ्युनरल झालं. चर्चमधले सिस्टर्स आले, आणि आमचे म्हातारेही. त्यांनी हळू आवाजात आमची प्रार्थनागीतं म्हटली. पण तिच्या बॉडीची अवस्था अशी होती की आमच्या पद्धतीनं जे करायचं होतं, ते करता आलं नाही. मला त्याचं फार वाईट वाटलं. अॅनाचा आधीचा नवरा, ओडा, गाणं सुरू झालं की बाजूला जाऊन उभा राहिला. आई एक शब्द बोलली नाही. तिच्या हातात अॅनाचा रुमाल होता. तो तिनं सगळ्या वेळ घट्ट धरून ठेवला होता.
मिस्टर हेल आले. त्यांनी आईचा हात धरला. “लिझी,” ते म्हणाले, “मी तुला वचन देतो, ज्यानं हे केलं, त्याला मी शोधून काढतो. न्याय झाल्याशिवाय मी बसणार नाही.”
आईनं त्यांचे हात घट्ट पकडले. “धन्यवाद,” ती म्हणाली. “धन्यवाद.”
मी त्यांच्याकडे बघत होते. ते आईला धीर देत होते, आणि त्यांच्या बाजूला उभ्या असलेल्या माझ्या नवऱ्यानं माझा हात हलक्या हाताने दाबला.
मला आठवतं, त्याच आठवड्यात चर्चच्या बाहेर मी बायरनला पाहिलं. काळा सूट घातलेला, कोपऱ्यात एकटा उभा. तो माझ्याकडे बघत नव्हता. मी पुढे गेले नाही, आणि का नाही, ते मला आजही नीट सांगता येत नाही.
अॅनाची निळी टोपी कधी परत आली नाही. मी विचारलं नाही. शेरीफलाही नाही, कुणालाच नाही.
त्या रात्री झोप लागली नाही. पहाटे जेम्स उठून रडायला लागला, मी त्याला जवळ घेतलं. पुढची कोण, हा विचार नेमका कधी आला, ते मला सांगता येत नाही. कदाचित तेव्हाच. कदाचित खूप नंतर.
* * *
भाग ४ : आई
अॅनाच्या केसचा तपास फार दिवस चालला नाही.
दोन डॉक्टर भावांनी तिची बॉडी तपासली होती. मग त्यांनी तिची कबर पुन्हा उघडली, गोळी शोधायला. ती सापडली नाही. आईनं कबरीकडे बघितलं नाही. ती घरी बसून राहिली.
मग जस्टिस ऑफ द पीसनं कागदावर लिहिलं की अॅनाचा मृत्यू “by person or persons unknown” झाला. बास. बायरन आणि अर्नेस्टला दोन-तीन दिवस पकडून ठेवलं होतं, पुरावा नाही म्हणून सोडून दिलं. अर्नेस्ट घरी आला तेव्हा थकलेला होता. मी त्याला जेवायला वाढलं. मला त्याचं वाईट वाटलं. आणि मला त्या वेळी वाटलं, हे असंच असतं, तपासात आधी जवळचे लोक पकडतात.
आई आमच्या घरी राहायला आली. म्हणजे आली नाही, मी तिला आणलं. तिच्या स्वतःच्या घरात ती दिवसभर खिडकीजवळ बसून रस्त्याकडे बघायची, जिथून अॅना गेली होती. मी म्हटलं, “आई, तू आमच्याकडे चल.” ती काही म्हणाली नाही. फक्त उठून एक शाल घेतली.
लिझी माझी आई. तिची एक सवय होती. कुणाला काही सांगायचं असलं की ती काहीतरी करायची. स्टोव्ह पेटवायची, ब्रेडचं पीठ मळायची. शब्द कधी नाहीत. आता तिनं स्टोव्हला हात लावला नाही.
“आई, कॉफी करू?”
“नको.”
“थोडं जेव.”
“नको.”
पंधरा दिवसांत ती आणखी सुकली. अंगावरची शाल ढगळ झाली. मला मिनीची आठवण आली. मी तो विचार तिथेच थांबवला.
एका रात्री ती म्हणाली, “मॉली, अॅनाला खूप भीती वाटली का ग?”
मी काय बोलणार? “नाही आई. तिला काही कळलं नसेल.”
“खोटं बोलतेस.”
“नाही आई.”
“तू चांगली बोलतेस खोटं. मी तुला शिकवलं नाही.” ती हसली. मी तिच्या हातावर हात ठेवला.
थोड्या वेळानं ती म्हणाली, “वाकोन-ता आमच्यावरचा हात काढून घेतलाय. आपले लोक, आपलं घर. हे सगळं जातंय.”
मी काही बोलले नाही. वाकोन-ता म्हणजे आमचा देव, आमचा निर्माता. ती असं बोलली की मला वाटायचं, आई स्वतःशीच बोलतेय.
मी गोऱ्या डॉक्टरांना बोलावलं. ते आले, नाडी बघितली, ताप नाही, काही दुखणं नाही. “दुःखात असेल,” ते म्हणाले. “वेळ लागेल.” त्यांनी काहीतरी औषध दिलं, ते घेऊन आईनं एक घोट प्यायला आणि बाकी ठेवलं.
मी आमच्या एका म्हाताऱ्याला बोलावलं. तो आमच्या पद्धतीनं उपचार करणारा. आई त्यावर फार विश्वास ठेवायची. तो खोलीत बसला, हळू आवाजात काहीतरी म्हणत राहिला. आई डोळे मिटून ऐकत होती. जाताना तो मला दारात म्हणाला, “बाळ, हे मला कळत नाही. मी याआधी हे पाहिलं नाही.”
“म्हणजे?”
“हा थकवा नाही. हा वेगळाच काहीतरी आहे.”
मी त्याला पैसे दिले. त्यानं घेतले नाहीत.
रिटा आणि तिचा नवरा बिल रोज येऊ लागले. रिटा आईला पुस्तकं वाचून दाखवायची. ती वाचायला लागली की आई डोळे उघडायची, बघायची. रिटा मिनीला जसं वाचून दाखवायची तसंच आईलाही. मला वाटायचं, ती हेच करत राहील तर काहीतरी थांबेल.
एका संध्याकाळी बिल मला बाहेर यार्डमध्ये घेऊन गेला. तो शांत माणूस होता, गोरा, पण आमच्यातच रुळलेला. बोलताना तो कधी मोठ्यांदा बोलायचा नाही.
“मॉली,” तो म्हणाला. “मला तुला काहीतरी सांगायचंय. आधी रागावू नकोस.”
“काय?”
“चार्ल्स व्हाइटहॉर्न. तो मे महिन्यात बेपत्ता झाला, कुणी बघितला नाही. अॅना. आता लिझी.” तो थांबला. “हे योगायोग नाहीत.”
“बिल.”
“मला वाटतं तिला विष दिलं जातंय.”
मी त्याच्याकडे बघत राहिले. मग रागानं म्हटलं, “गप्प बस. आईसमोर असं बोलू नकोस. ती आजारी आहे. शोकात आहे.”
“मॉली...”
“कुणी तिला विष का देईल? तू काय बोलतोयस?”
“ती ओसेज आहे. तिच्या नावावर headright आहे.”
“आम्हा सगळ्यांच्या नावावर आहे,” मी म्हटलं.
तो काही बोलला नाही. मग त्यानं माझ्याकडे बघितलं, जणू काही मला सांगायचं होतं आणि मी ऐकत नव्हते.
मी आत गेले. आईला पाणी दिलं.
ती रात्र मी जागी होते. मला झोप लागेना. मला प्रश्न पडला, बिलला नेमकं काय वाटतं? पण दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य निघाला, एलिझाबेथनं दूध मागितलं, आणि विचार मागे पडला.
जुलै महिना आला. आई पूर्ण अंथरुणाला खिळली.
एका दुपारी ती मला म्हणाली, “मॉली, कॉफी कर.”
मी चकित झाले. “आई, तू पिणार?”
“हो. तुझी कर.”
मी स्वयंपाकघरात गेले. आईसारखी कडू, जळकी कशी करायची हे मला माहीत होतं. पण मला वाटलं, आज तिला नीट कॉफी हवी असेल. मी काळजीपूर्वक केली. भांडं लक्षपूर्वक बघत राहिले. ती जळली नाही.
मी कप घेऊन गेले. आईनं एक घोट घेतला.
ती थोडा वेळ गप्प राहिली.
“जळली नाही,” ती म्हणाली.
“मी नीट केली.”
“मला नीट नको होती.” ती हसली. “तू जळवायला शिक.”
“मी पुन्हा करते.”
“नको.”
तिनं कप खाली ठेवला. ती डोळे मिटून झोपली.
त्या रात्री ती गेली. मला कुणीतरी उठवलं. आई पलंगावर होती, शांत. खिडकी उघडी होती. बाहेर रातकिडे ओरडत होते. मी तिचा हात धरला. तो उबदार होता, अजून. मला वाटलं, हात थंड व्हायला वेळ लागतो. म्हणून मी तसाच धरून बसले.
रिटा माझ्या बाजूला बसली. ती रडत नव्हती. “मॉली,” ती म्हणाली, “आता आपल्या दोघीच.”
मी तिच्याकडे बघितलं. “हो.”
मग मी उठले आणि खिडकी बंद केली. रातकिड्यांचा आवाज मला सहन होत नव्हता. रिटा म्हणाली, “उघडी राहू दे, आईला आवडायचं.” मी तिच्यावर ओरडले, “बंद कर म्हणते ना!” ती गप्प बसली. नंतर मला त्याचं वाईट वाटलं. तेव्हा नाही.
फ्युनरलची सगळी तयारी मिस्टर हेल यांच्या दुकानातून झाली. मी त्यांच्याकडे गेले आणि पैशाबद्दल विचारलं. ते म्हणाले, “मॉली, हे मी करतो. आज काही देऊ नकोस.” त्यांनी माझा हात धरला. तो उबदार होता, कोरडा.
मी आभार मानले.
त्यानंतर आठवड्यानं वकील आला. आईच्या नावावरचा हिस्सा आता कुणाच्या नावावर लागायचा, त्याचे कागद. मी त्याने सांगितलेल्या ठिकाणी सह्या केल्या. पेन चांगलं होतं, शाई गळत नव्हती.
मी कागद वाचले नाहीत. वाचायला ताकद नव्हती.
* * *
भाग ५ : शांत वर्षं
आईच्या मृत्यूनंतर आमच्या गावात एक नवीनच शांतता आली.
कुणी बोलत नव्हतं असं नाही. बोलणं चालू होतं, दुकानं चालू होती, चर्चमध्ये रविवारी गर्दी होत होती. पण सगळे हळू बोलायला लागले. जणू कुणीतरी ऐकतंय. आणि एकमेकांकडे बघताना आम्ही थोडं जास्त वेळ बघायला लागलो. कोण आजारी दिसतंय? कोण वजन गमावतंय? कोण आज दिसलं नाही?
आमच्या गावात आता दर काही महिन्यांनी एक फ्युनरल व्हायचं. आणि प्रत्येक वेळी कारण वेगळं मिळायचं.
१९२२ च्या फेब्रुवारीत विल्यम स्टेपसन गेला. एकोणतीस वर्षांचा, आमचाच. म्हणाले, विषबाधा. कुठल्या विषाची, कशी, कुणीच सांगितलं नाही. त्यानंतरच्या काही महिन्यांत आणखी दोघं गेले. तेही तसेच, विषानं असा संशय. कुणी नावं घेतली नाहीत. आम्ही नावं घेत नव्हतो. मला वाटतं ते नाव घेतल्याने ते आणखी खरं होईल असं वाटायचं.
तोपर्यंत माझ्या घरात बदल झाला होता. मला मुलगी झाली. मी तिचं नाव अॅना ठेवलं. अर्नेस्टनं मला काही विचारलं नाही, फक्त म्हणाला, “चांगलं नाव आहे.” तो तेव्हा माझ्याशी फार चांगला वागायचा.
सकाळी मी आईची कॉफी करायला लागले. जळकी. मुद्दाम. मी भांडं स्टोव्हवर विसरायचे, जणू मला दुसरं काम आहे. अर्नेस्ट पहिल्या घोटाला चेहरा वाकडा करायचा.
“मॉली, जळली.”
“जळली तर जळली. गरम आहे ना? पी.”
तो हसायचा. प्यायचा. त्यानं कधी तक्रार केली नाही. मला त्याच्या त्या हसण्याचं आता वेगळंच वाटतं, पण तेव्हा मला फार बरं वाटायचं.
ऑगस्टमध्ये न्यूजपेपरमध्ये एक छोटी बातमी आली, पाचव्या पानावर, जाहिरातींच्या खाली:
“ओसेज काउंटीतले तेलवाले बार्नी मॅकब्राईड वॉशिंग्टनला निघाले होते. प्रवासात त्यांच्यावर चाकूनं हल्ला झाला. ते मृतावस्थेत सापडले.”
बस. तो कशासाठी निघाला होता, ते बातमीत नव्हतं. ते आम्हाला लोकांकडून कळलं: सरकारला सांगायला की इथे काहीतरी चुकतंय.
मी ते पान तीनदा वाचलं. मग रिटाला दाखवलं.
“मॉली,” रिटा म्हणाली, “आता कळलं का बिल काय म्हणतोय?”
“रिटा.”
“मी बिलला विचारतेय, तो मला सांगत नाही. तो रात्री झोपत नाही.”
मी काही बोलले नाही.
जानेवारी १९२३ मध्ये आणखी दोन बॉडी सापडल्या. जो ग्रेहॉर्स आणि अॅना सँडफोर्ड. मला ते आमचेच वाटले, कारण आमचं गाव लहान आहे आणि मी त्यांना ओळखत होते. मी चर्चमध्ये गेले आणि फक्त बसून राहिले.
आणि त्यानंतर हेन्री रोआन.
हेन्री रोआन माझा पहिला नवरा होता.
म्हणजे नवरा म्हणायला मी पंधरा वर्षांची होते, आणि तो तेवढाच. आमच्यात त्या काळी अशी लग्नं ठरवली जायची. आम्ही दोघं मुलंच होतो. थोड्याच दिवसांत तो शिकायला दूर, पूर्वेकडे, मोठ्या शाळेत गेला. मी इकडे राहिले. मग आम्ही दोघांनी दुसरी लग्नं केली. कागदावर काही नव्हतं. मी अर्नेस्टला हे कधी सांगितलं नाही. त्यानं कधी विचारलं नाही.
हेन्री मोठा झाला तसा थोडा दारूत गेला, लोक म्हणायचे. मला खात्री नाही. मी त्याला रस्त्यात भेटायचे, तो नेहमी नीट कपडे घालायचा. फाटलेल्या पायजम्याचा हेन्री मी कधी पाहिला नाही.
१९२३ च्या हिवाळ्यात एकदा तो माझ्या दारात आला. मला आश्चर्य वाटलं. तो फार दिवसांनी आला होता.
“मॉली,” तो म्हणाला. “तुला एक सांगायचंय. बसू का?”
“बस.”
तो खुर्चीच्या अगदी काठावर बसला आणि गुडघ्यावर बोटं वाजवत राहिला.
“बिल हेल माझा फार चांगला मित्र आहे,” तो म्हणाला. “मला पैसे दिले, कर्ज. कधी तुला सांगितलं नाही. तो फार दयाळू आहे. मागच्या महिन्यात म्हणाला, एक कागद आहे, सही कर, तुझंच भलं आहे. मी केली.”
“काय कागद?”
“विम्याचा. काही तरी. त्यानं सांगितलं की मी मेलो तर त्याचं कर्ज फिटेल, म्हणून. मला वाटलं हे बरोबरच आहे.” तो हसला. “मी कुठे मरणार आहे, मॉली?”
मी तेव्हा काहीच बोलले नाही.
मी त्याला विचारलं नाही कागद वाचलास का. मी स्वतः कागदांवर सही करत आले होते, आईच्या वेळीही. आणि त्याला विचारायला मला काय हक्क?
तो चहा प्यायला. जाताना दारात थांबला. “तू ठीक आहेस ना, मॉली?”
“हो.”
“तुझी आई गेली, मला समजलं. वाईट वाटलं.”
“थँक्यू.”
तो गेला.
पुढच्या आठवड्यात, ६ फेब्रुवारीला, त्याला कुणीतरी शोधून काढलं. फेअरफॅक्सच्या जवळ, काही मैल बाहेर, एका ओढ्याच्या कडेला, त्याच्या बुइक गाडीत. स्टिअरिंग व्हीलवर पडलेला. डोक्याच्या मागे गोळी.
मी बातमी ऐकली तेव्हा स्वयंपाकघरातल्या भांड्यात मीठ घालत होते. मी ते भांड्यात तसंच ओतलं. नंतर जेवताना अर्नेस्ट म्हणाला, “आज जेवण खारट आहे.”
“हो,” मी म्हटलं.
मिस्टर हेल त्याच्या फ्युनरलला आले. त्यांनी सर्वात पुढचा कोपरा पकडला होता, कॉफिनचा. ते त्याचे जवळचे मित्र होते ना. त्यांनी मोठा काळा कोट घातला होता. त्यांच्या डोळ्यांत पाणी होतं. खरं पाणी, मी बघितलं.
मी त्यांच्या बाजूला उभी होते. त्यांनी माझ्याकडे बघून हलकेच मान हलवली. मी पण हलवली.
तेव्हा मला वाटलं, ते फार चांगले माणूस आहेत. इतका जिवलग मित्र गेला, आणि तरी ते आम्हाला सांभाळायला येतात.
अर्नेस्ट त्या दिवसात उशिरा घरी यायचा. मी विचारायचे, “कुठे होतास?” तो म्हणायचा, “काकांसोबत.” त्याच्या बुटांना लाल चिखल लागलेला असायचा. मी तो धुवायचे. एकदा मला त्याच्या कोटाच्या खिशात एक पावती सापडली, एका ठिकाणाची, जिथे मी कधी गेले नव्हते. मी ती तशीच परत ठेवली.
मला वाटतं, मला तेव्हा थोडी भीती वाटली. पण ती नेमकी कशाची, ते मला कळलं नाही. म्हणून मी भांडी धुतली.
रिटा एके दिवशी भेटायला आली. तिच्या चेहऱ्यावर काळजी होती.
“मॉली, बिल म्हणतो आता आपण इथून जावं.”
“कुठे?”
“कुठेही. गावाच्या बाहेर. थोडे दिवस.”
“आणि घर?”
“घर राहील.” ती थांबली. “तू काय म्हणतेस?”
“आपण इथेच जन्मलो, रिटा.”
“तेच तर.”
मी तिला चहा दिला. ती थोडा वेळ बसली. जाताना म्हणाली, “मग रविवारी या. जेवायला. मी चिकन करते.”
“येईन.”
* * *
भाग ६ : रात्री दोन वाजता
शनिवारची रात्र होती. मी झोपले होते. एलिझाबेथ आणि जेम्स शेजारच्या खोलीत झोपले होते. छोटी अॅना माझ्याच कुशीत होती.
आवाज कसा होता, ते मी अजून सांगू शकत नाही. गडगडाट नव्हता. कुणीतरी आभाळ उचलून जमिनीवर आपटल्यासारखं झालं. खिडकीची काच थरथरली. कपाटातली भांडी वाजली. अॅना दचकून रडायला लागली.
मी उठून बसले. अंधार होता. बाहेर कुत्री भुंकत होती. एकाची दोन झाली, दोनाची दहा.
अर्नेस्ट माझ्या शेजारी उठून बसला होता.
“काय झालं?” मी विचारलं.
“काहीतरी फुटलं,” तो म्हणाला. “तेलाचा टँक असेल.”
“इतका मोठा?”
“झोप तू. मी बघतो.”
तो बूट घालायला खाली वाकला. आणि मला आत्ता, इतक्या वर्षांनी, एक गोष्ट आठवते. बूट खुर्चीजवळ नव्हते. दारापाशी होते. एरवी तो रात्री बूट खुर्चीखालीच ठेवायचा.
पण हे मला तेव्हा जाणवलं नाही. तेव्हा मी अॅनाला थोपटत होते. “गप ग, गप. काही नाही. काही नाही.”
तेवढ्यात दारावर थाप पडली. बाहेर जेकबचा आवाज होता. आमच्या शेजाऱ्यांचा मुलगा. धावत आला होता, धाप लागली होती.
“मिसेस बर्कहार्ट! फेअरफॅक्सला... बिल स्मिथचं घर...”
मी दार उघडलं.
“काय झालं बिलच्या घराचं?”
“घर नाही, मिसेस बर्कहार्ट. घर नाहीच. सगळं उडालं.”
मला आठवतं, मी त्याला एकच प्रश्न विचारला. मूर्खासारखा.
“रिटा घरी होती का रे?”
त्याला काय सांगावं सुचेना. तो माझ्या पायांकडे बघत राहिला. मी अनवाणी उभी होते, हे मला तेव्हा लक्षात आलं.
अर्नेस्ट कोट घालून बाहेर आला. त्याचा चेहरा कसा होता, हे मी सांगू शकत नाही. लँटर्न लांब होता.
“तू इथेच थांब,” तो म्हणाला. “मुलांना सोडू नकोस. मी जातो.”
“मी पण येते.”
“नको, मॉली. तू पाहू नकोस.”
काय पाहू नको, ते त्यानं सांगितलं नाही. मी विचारलं नाही.
कार सुरू झाली आणि दिव्यांचा प्रकाश रस्त्यावर पुसट होत गेला.
* * *
मी थांबले.
रात्र लांब असते, पण ती रात्र जास्तच लांब होती. मी स्टोव्ह पेटवला आणि पाणी ठेवलं. का, ते मला माहीत नाही. हात काहीतरी करत राहिले पाहिजेत, म्हणून असेल. पाणी उकळलं, आटलं, मी पुन्हा भरलं. आई गेली होती. अॅना गेली होती. आणि रिटा... मी तिचं नाव मनात घेतलंच नाही.
पहाट व्हायच्या आधी शेजारची बाई आली. मिसेस पीटरसन. तिनं माझ्या खांद्यावर शाल टाकली.
“चल, मॉली. बस जरा.”
“रिटा कुठे आहे?”
तिनं उत्तर दिलं नाही. तिनं फक्त माझा हात धरला. तिचा हात थंड होता. आणि मला कळलं. मिसेस पीटरसन माझ्या शेजारी बसून राहिल्या, पुढे काही बोलल्या नाहीत.
* * *
उजाडल्यावर मी मुलांना पीटरसन बाईकडे ठेवलं आणि फेअरफॅक्सला गेले. कुणीतरी मला कारमध्येून नेलं. नाव आठवत नाही.
जागेवर पोचले तेव्हा तिथे घर नव्हतं.
मला वाटलं मी चुकीच्या गल्लीत आले. रिटाचं घर पांढरं होतं. पुढे पोर्च होता. पोर्चवर लाकडी स्विंग होता, बिलनं स्वतः लावलेला. आता तिथे नुसता खड्डा होता. भोवती वाकडी झालेली पत्र्याची पाती आणि जळक्या लाकडाचे तुकडे. एक अर्धी खुर्ची. एका पडक्या भिंतीवर रिटाच्या स्वयंपाकघरातला कॅलेंडर अडकलेला होता, अर्धा जळलेला. मार्चचं पान.
आसपासच्या घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या होत्या. लोक रस्त्यावर उभे होते, अंगावर कोट, पायात स्लिपर्स, झोपेतून उठलेले. कुणी बोलत नव्हतं. आम्ही ओसेज लोक अशा वेळी गप्प राहतो, पण त्या दिवशी गोरे लोकही गप्पच होते.
अर्नेस्ट तिथेच होता. बाकीच्या माणसांबरोबर तो ढिगाऱ्यातून काही उचलत होता. त्याचे कपडे काळे झाले होते. मला बघून तो उठला आणि पुढे आला.
“मी सांगितलं होतं ना,” तो म्हणाला.
“रिटा?”
तो एक क्षण थांबला. “मिळाली.”
“कुठे आहे?”
“मॉली...”
“मला दाखव.”
“नको.”
मी तरीही गेले. कुणीतरी तिच्यावर चादर टाकली होती. चादरीखाली किती थोडं होतं, हे मी बघितलं. तिचा एक हात बाहेर दिसत होता. कोपरापासून पुढे. ब्रेसलेट तसंच होतं. तेच ब्रेसलेट, जी तिनं माझ्या लग्नात मला मागितली होती आणि मी दिली नव्हती. रिटा म्हणायची, “तू मला कधी काही देत नाहीस.” आणि मी म्हणायचे, “तुझ्याकडेच आहे ना सगळं?”
मी पुढे काही बघितलं नाही. डोळे मिटले नाहीत, फक्त बघणं थांबलं.
मग मी ओरडले. रिटाचं नाव घेऊन, पुन्हा पुन्हा. एका गोऱ्या माणसानं मला मागे ओढलं आणि मी त्याच्या हाताला चावले. हो, चावले. त्याच्या हातावर माझ्या दातांचे वळ उमटले. तो नंतर मला काहीच म्हणाला नाही, आणि मी त्याचं नावही कधी विचारलं नाही.
बिलला त्यांनी रात्रीच बाहेर काढलं होतं. तो जिवंत होता. शोधणाऱ्यांमध्ये अर्नेस्टही होता, असं कुणीतरी मला नंतर सांगितलं. बिलचं सगळं अंग भाजलं होतं, इतकं की त्याला कोण आहे ते ओळखायला त्यांना वेळ लागला. डॉक्टर शौन त्याला घेऊन गेले होते.
आणि नेटी. त्यांच्याकडे मेड म्हणून काम करणारी मुलगी. एकोणीस वर्षांची असेल. गोरी होती, गावातल्याच कुणाची तरी. ती सुद्धा त्या घरात झोपली होती. तिला शोधत माणसं दिवसभर ढिगाऱ्यातून काम करत राहिली. तिचं काही सापडलं नाही. कुणी म्हणालं, इतक्या आगीत काही उरत नाही.
मी तिच्या आईला गावात एकदा बघितलं. ती फक्त रस्त्यावर चालत होती. कुठे जायचं ठरवून नाही. नुसती चालत होती.
* * *
रविवारी मी बिलला बघायला गेले.
त्याच रविवारी रिटाने मला जेवायला बोलावलं होतं. “मी चिकन करते,” ती म्हणाली होती. त्या दिवशी मी तिच्या टेबलाजवळ नाही, तर तिच्या नवऱ्याच्या बिछान्याजवळ बसले होते.
बिल पांढऱ्या पट्ट्यांनी गुंडाळलेला होता. फक्त डोळे दिसत होते, आणि ओठ. ओठ फाटले होते.
तो रात्रभर आणि दिवसभर बेशुद्ध होता, असं नर्सनं सांगितलं. आता शुद्धीवर आला होता. पण रिटाबद्दल त्याला कुणी सांगायचं, यावरून आपापसात बोलणं चाललं होतं.
मी बसले. त्यानं माझ्याकडे बघितलं.
“मॉली.”
“हो, बिल.”
“रिटा?”
मी त्याचा हात धरला. तो हात म्हणजे पट्टी होती. काय धरावं तेच समजत नव्हतं.
“नाही, बिल,” मी म्हणाले.
तो काही बोलला नाही. डोळे मिटले. डोळ्याच्या कोपऱ्यातून पाणी आलं आणि पट्टीत मुरलं.
मी बराच वेळ तशीच बसले. खोलीत एक घड्याळ होतं आणि त्याची टिकटिक. मला आठवतं, मी ती मोजत होते.
मग तो हळूच म्हणाला. इतक्या हळू की मला वाकून ऐकावं लागलं.
“मला या जगात दोनच शत्रू आहेत, मॉली.”
“बिल, बोलू नकोस.”
“दोघंच.”
मी काही बोलले नाही.
“बिल हेल. आणि अर्नेस्ट.”
मी हात सोडला नाही. मला माहीत नाही का, पण सोडला नाही.
“तुला ताप आहे, बिल,” मी म्हणाले. “तू काहीतरी बोलतोयस.”
“हो,” तो म्हणाला. “तेच बरं असेल.”
आणि त्यानं पुन्हा डोळे मिटले.
नर्स दारात उभी होती. तिनं सगळं ऐकलं होतं, हे तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. मी तिच्याकडे बघितलं. ती पटकन दुसरीकडे बघायला लागली, जणू तिला काहीच ऐकू आलं नाही.
बाहेर पडताना मी स्वतःला सांगितलं, ताप आहे. भाजलेला माणूस आहे. त्याला काय माहीत?
तरीही मी घरी येईपर्यंत ते दोन शब्द एकामागून एक माझ्या डोक्यात फिरत राहिले. जसं गाडीच्या मागे बांधलेलं डबडं ओढत नेतात.
* * *
बिल चौथ्या दिवशी गेला.
तो पुन्हा शुद्धीवर आला नाही. डॉक्टर शौन नंतर म्हणाले, त्यानं स्फोटाबद्दल काही सांगितलं नाही. मी त्यांना त्या रविवारी जे ऐकलं ते सांगितलं नाही.
का नाही सांगितलं, असं मला आता लोक विचारतात. मलाही माहीत नाही. बहुधा मी घाबरले होते. किंवा मला वाटलं, ताप असलेल्या माणसाचं बोलणं कोण गंभीरपणे घेईल.
अर्नेस्टला मात्र मी काही बोलले नाही. तोही काही बोलला नाही. त्या रात्री आम्ही शेजारी शेजारी झोपलो. त्याच्या उश्याशी तो कोट ठेवला होता, ज्याला जळाल्याचा वास येत होता. मी तो धुवायला नेला नाही. त्यानंही मागितला नाही.
मध्यरात्री तो अचानक म्हणाला, “मॉली, झोप आली नाही का तुला?”
“नाही.”
“मला पण नाही.”
बस. तेवढंच.
मग तो थोड्या वेळाने म्हणाला, “रिटाला मी चांगलं ओळखत होतो.”
“हो,” मी म्हणाले.
तो पुन्हा गप्प झाला. आणि मी ऐकत राहिले. तो श्वास कसा घेतोय ते.
* * *
फ्युनरल दोघांचं मिळून झालं. रिटा आणि बिल. नेटीचं काही नव्हतं. तिच्यासाठी वेगळी प्रार्थना ठेवली होती, पण पेटी रिकामी असल्यानं कुणाला काय करावं तेच कळलं नाही.
चर्चमध्ये गर्दी होती. मिस्टर हेल पुढच्या रांगेत बसले होते. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला.
“मॉली,” ते म्हणाले. “मी काहीतरी करणार आहे. मी या प्रकरणाचा तळ गाठल्याशिवाय राहणार नाही.”
मी मान हलवली.
“ही माणसं पकडली गेलीच पाहिजेत,” ते पुढे म्हणाले. “तुला माझं वचन आहे.”
त्यांचे डोळे ओले होते. मला खात्री आहे, ते खरे होते.
* * *
एक आठवड्यानंतर वकिलाकडून कागद आले. रिटाची प्रॉपर्टी, तिचा हेडराईट, आता माझ्या नावावर येत होता. ती आणि मी, आम्ही दोघीच उरलो होतो; आता मी एकटी.
कागदावर सही करायची होती. अर्नेस्ट बाजूला उभा होता.
“मी वाचून देतो तुला,” तो म्हणाला.
“मी वाचेन.”
“तुला डोळ्यांना त्रास होतो ना हल्ली.”
“मी वाचेन, अर्नेस्ट.”
त्यानं पेन माझ्या हातात दिलं आणि पुढे काही बोलला नाही.
मी वाचलं. एका ओळीनंतर पुन्हा तीच ओळ वाचायला लागले. शब्द मला समजत होते, पण मला त्यांचा अर्थ लागत नव्हता.
मग सही केली.
* * *
त्या रविवारी, बिलला बघायला जाण्याआधी, सकाळी मिसेस पीटरसन माझ्या दारात आली होती. हातात झाकलेली डिश होती.
“काही नको होतं, पण घरी केलं,” ती म्हणाली. “तू काही खाल्लं नसशील.”
मी डिश घेतली. आत चिकन होतं. भाजलेलं, अजून कोमट.
मी ती टेबलावर ठेवली. एलिझाबेथ आली आणि तिनं एक तुकडा उचलला.
“आई, रिटा मावशी येणार नाही का आज?”
मी तिच्याकडे बघितलं. ती चार वर्षांची होती. तिला काहीच कळत नव्हतं.
“नाही ग,” मी म्हणाले. “आज नाही.”
“मग हे आपण खाऊ?”
“हो. खा.”
ती खात होती. तिच्या हनुवटीला तेल लागलं होतं. मी ते पुसलं.
* * *
भाग ७ : मी आजारी
रिटाच्या मागे आम्ही घराचे दरवाजे रात्री आतून लावायला लागलो. आधी लावत नव्हतो. ओसेज लोक दरवाजे लावत नसत, आणि आमच्या गावात कुणी चोरी करतही नव्हतं. पण आता आम्ही लावत होतो. अर्नेस्ट रोज रात्री एकदा दरवाजा तपासायचा, मग खिडक्या. मग मला विचारायचा, “कुलूप लावलंस ना?”
“तू आत्ताच लावलंस ना?”
“हो, पण पुन्हा बघ.”
मला त्याचं हे वागणं आवडायचं. म्हणजे आवडायचं, असं मी स्वतःला सांगायचे. आपल्या बायकोच्या घराची इतकी काळजी घेणारा नवरा. बाकी बायकांचे नवरे घरीही यायचे नाहीत.
* * *
उन्हाळा आला. गावात बातम्या येतच होत्या. त्या आता कुजबुज राहिल्या नव्हत्या; दुकानात, चर्चबाहेर, उघडपणे.
जूनमध्ये हेन्री ग्रॅमर नावाचा माणूस कार अॅक्सिडेंटमध्ये गेला. मी त्याला ओळखत नव्हते. फक्त नाव ऐकलं होतं. लोक म्हणाले, त्याला काहीतरी माहीत होतं. कारीचे ब्रेक नीट नव्हते, असंही कुणीतरी म्हणालं.
त्याच महिन्यात एक वकील ट्रेनमधून फेकला जाऊन मेला. तो एका आजारी ओसेज माणसाला भेटून परत येत होता. त्या माणसानं त्याला काहीतरी सांगितलं होतं, असं म्हणतात.
मी हे ऐकायचे आणि गप्प बसायचे. मी स्वयंपाकघरात गेले की मला कुणीतरी पाठीमागून पाहतंय असं वाटायचं. मी वळून बघायचे. कुणी नसायचं. एलिझाबेथ खेळत असायची.
एका संध्याकाळी मी अर्नेस्टला म्हटलं, “लोक म्हणतात, कुणीतरी आपल्या सगळ्यांच्या मागे आहे.”
“लोक काहीही म्हणतात.”
“दोन डझन ओसेज गेले, अर्नेस्ट.”
“तू आकडे मोजतेस?”
“सगळे मोजतात.”
तो उठला आणि माझ्या शेजारी येऊन बसला. त्यानं माझ्या खांद्याभोवती हात टाकला.
“आपण यातून बाहेर पडू,” तो म्हणाला. “मी तुला काही होऊ देणार नाही.”
मी त्याच्या छातीवर डोकं टेकवलं. त्याचा हार्टबीट मला ऐकू येत होता. मला वाटलं, हे खोटं कसं असेल? मी डोळे मिटले आणि तशीच झोपले.
* * *
मला साखरेचा त्रास आहे हे आधीपासून माहीत होतं. आम्ही त्याला “गोड रोग” म्हणायचो. डॉक्टर सांगायचे, गोड कमी खा. पण मला सगळं गोड आवडायचं.
रिटानंतर तो वाढला. किंवा मला तसं वाटलं. सतत तहान लागायची. पाणी पिऊन पिऊन पोटात खळखळायचं, तरी घसा कोरडा. मग थकवा. दुपारी एलिझाबेथला ब्रेड भरवताना मी हातात घास धरून झोपून जायचे.
अर्नेस्ट मला डॉक्टर शौन यांच्याकडे घेऊन गेला. तिथे मला दर आठवड्याला इंजेक्शन मिळायला लागलं. इन्सुलिन. तेव्हा नवं औषध होतं, महाग होतं. पण आमच्याकडे पैसे होते. हेल म्हणाले, “पैशाची काळजी करू नकोस मॉली, काहीही लागलं तर सांग.”
मी सांगत नव्हते. कारण मला कशाचीही गरज वाटत नव्हती. फक्त झोप येत होती.
इंजेक्शन घेऊन आलं की थोडं बरं वाटायचं. दोन दिवस. मग पुन्हा तीच अवस्था. मी कधी कधी मनात हिशोब करायचे. जेव्हा बरं वाटलं तेव्हा काय खाल्लं होतं? जेव्हा वाईट वाटलं तेव्हा कुणी काय दिलं होतं?
पण असले हिशोब मी फार वेळ केले नाहीत. डोकंच चालायचं नाही.
* * *
माझी आई जाण्याआधी मी तिला काय म्हणाले होते? “आई, तुला डॉक्टरला दाखवू या.” आणि तिनं उत्तर दिलं होतं, “हा थकवा नाही.”
आता मी तिच्याच जागी आले होते. आणि मला स्वतःला तीच वाक्यं ऐकू येत होती. थकवा. फक्त थकवा. काळजी नको.
एके दिवशी मी एलिझाबेथला म्हणाले, “जा, बाबाला बोलाव.”
ती पाच वर्षांची होती. ती दारात उभी राहिली आणि म्हणाली, “आई, तू आता रोज झोपतेस का?”
“नाही ग. जरा थकले आहे.”
“आजीसारखी?”
मी तिच्याकडे बघितलं. तिनं हे कुठून काढलं? मी तिच्यासमोर आईचं नावही काढलं नव्हतं.
“बाबाला बोलाव,” मी पुन्हा म्हणाले.
ती गेल्यावर मी बाथरूममध्ये जाऊन नळ सुरू केला आणि रडले, म्हणजे आवाज बाहेर जाऊ नये म्हणून. रडताना पोटात दुखलं. ते साखरेमुळे का रडण्यामुळे, ते मला कळलं नाही.
* * *
अर्नेस्ट त्या दिवसांत खूप चांगला वागला. हे मी सांगितलंच पाहिजे, कारण नंतर सगळं उलटं झालं आणि त्या दिवसांबद्दल मी स्वतःलाही खरं सांगत नाही, असं लोकांना वाटतं.
तो रोज सकाळी माझ्यासाठी कॉफी आणायचा. पलंगाजवळ, ट्रेवर ठेवून. मला नको असली तरी. तो मुलांना शाळेत सोडायचा, परत येताना भाजी आणायचा. रात्री मी उठले की तो जागा असायचा.
“काय हवंय?”
“पाणी.”
तो आणायचा. मी पिताना बघत उभा राहायचा.
“सगळं पी.”
मी पिऊन टाकायचे.
एकदा मी विचारलं, “अर्नेस्ट, तू मला का सोडून गेला नाहीस? मी तुला काही देऊ शकत नाही आता.”
“काय बोलतेस?” तो म्हणाला. “तू माझी बायको आहेस.”
त्याचा आवाज थरथरत होता. तो खरा होता. मला आजही वाटतं, तो खरा होता. त्या क्षणी तो खरंच म्हणत होता.
मग तो पाण्याचा ग्लास घेऊन आला आणि मी तो प्यायले.
* * *
बाहेर बदल होत होता. गावात गोरे लोक पुन्हा आमच्याशी बोलायला लागले होते, पण वेगळ्या आवाजात. जसं एखाद्या आजारी माणसाशी बोलतात. दुकानात पैसे देताना ते माझ्याकडे बघून खाली बघायचे. मला कळायचं नाही, ते मला वाचवू इच्छितात का आणखी काही.
आमच्यातली काही माणसं गाव सोडून गेली. काही फक्त रात्री भेटायला यायची, कुणाला कळू नये म्हणून. एक वृद्ध बाई माझ्याकडे आली. तिचं नाव मी सांगणार नाही. ती माझ्या आईला ओळखत होती.
“मॉली, तू खातेस ते कुठे केलेलं असतं?”
“घरी.”
“कोण करतं?”
“मी. आणि कधी कधी अर्नेस्ट.”
तिनं काहीच म्हटलं नाही. फक्त माझा हात धरला आणि म्हणाली, “आपल्या लोकांत जेवण करणारा घरातली बाई असतो. बाहेरचा पुरुष नाही.”
“तो माझा नवरा आहे.”
“हो,” ती म्हणाली. “तो तुझा नवरा आहे.”
आणि ती निघून गेली.
मी तेव्हा चिडले होते. मी तिला मनातल्या मनात शिव्या दिल्या. पण त्या रात्री मी स्वयंपाकघरात उभी राहून ब्रेडचं पीठ मळायला गेले आणि माझे हात इतके थरथरत होते की मला ते जमलं नाही.
* * *
१९२५ चा शरद ऋतू. झाडांची पानं पिवळी पडत होती. माझं वजन इतकं कमी झालं होतं की जुने कपडे लोंबायचे. एलिझाबेथ शाळेतून यायची आणि माझ्या शेजारी बसून अभ्यास करायची. जेम्स पाच वर्षांचा होता, तो माझ्या अंगावर चढायचा. मी त्याला उचलू शकत नव्हते.
छोटी अॅना तीन वर्षांची होती. ती माझ्या पलंगाजवळ खाली बसून माझ्या पायांशी खेळायची. तिचे केस सोनेरी-तपकिरी होते, आणि ती सारखी एक गाणं गुणगुणायची. शब्द नव्हते. आवाजच.
“आई, तू लवकर बरी हो. मग आपण बाहेर जाऊ.”
“हो ग.”
“कुठे?”
“जिथे तुला जायचंय तिथे.”
“तळ्यावर?”
“हो. तळ्यावर.”
ती हसली आणि पुन्हा गुणगुणायला लागली. ती तळ्यावर कधी गेली नाही.
एका सकाळी मी उठायला गेले आणि उठता आलं नाही. पाय माझ्या स्वतःचे नव्हते. मी अर्नेस्टला हाक मारली. तो धावत आला.
“मॉली!”
“मला... उठता येत नाही.”
त्यानं मला उचललं. माझं वजन किती कमी होतं, हे त्याच्या चेहऱ्यावर दिसलं. तो काही बोलला नाही.
कारमध्ये मला मागच्या सीटवर झोपवलं. एलिझाबेथ दारात उभी होती, हात तोंडावर ठेवून. मला तिच्याकडे हात हलवायचा होता. पण माझा हात उचलला गेला नाही.
* * *
हॉस्पिटलमध्ये मला पांढरी खोली मिळाली. खिडकीतून एक झाड दिसत होतं. त्याची पानं जवळजवळ गळून गेली होती.
अनेक दिवस मी तिथे पडून होते. कधी जाग यायची, कधी नाही. एकदा डोळे उघडले तर अर्नेस्ट खुर्चीत बसला होता. त्याचे डोळे लाल होते.
“तू झोपला नाहीस का?”
“झोप येत नाही.”
“जा घरी. मुलं आहेत.”
“मुलं ठीक आहेत. तू बरी हो.”
तो पुन्हा गप्प झाला. मग त्यानं खिशातून एक कॉफीचा थर्मास काढला.
“घरून आणली,” तो म्हणाला. “घे, थोडी.”
त्यानं झाकण उघडलं. वाफ आली. वास... मला वास आला नाही. तेव्हा मला कळलं, मला कशाचाच वास येत नव्हता.
मी कप हातात घेतला. गरम होता.
“आज जळली नाही,” मी म्हणाले.
तो हसायचा प्रयत्न करत होता. “तू केली असतीस तर जळली असती.”
मी कपाकडे बघितलं. तो मला बघत होता. नेहमी तसाच बघतो तसा.
मी एक घोट घेतला. मग दुसरा.
मग मी कप शेजारच्या स्टुलावर ठेवला.
“पी ना,” तो म्हणाला.
“थोड्या वेळाने. गार होऊ दे.”
तो काही बोलला नाही. कॉरिडॉरमधून कुणीतरी ट्रॉली ओढत नेली, तिचं एक चाक कुरकुरत होतं. मला तेवढंच ऐकू येत राहिलं.
* * *
भाग ८ : पाहुणे
हॉस्पिटलमध्ये मी जवळपास दोन महिने होते. बाहेर काय चाललंय, ते मला फारसं कळायचं नाही. पण पाहुणे यायला लागले होते, ते मात्र कळलं.
पहिला पाहुणा एक इन्शुरन्स विकणारा होता. असं तो म्हणाला.
तो एका दुपारी माझ्या खोलीच्या दारात उभा राहिला. फिकट रंगाचा सूट, खिशातून डोकावणारी पेन्सिल. वय चाळिशीचं. चेहरा असा, की रस्त्यात दिसला तर पुढच्या क्षणी विसरून जावा.
“मिसेस बर्कहार्ट?”
“हो.”
“माफ करा, मी चुकीच्या खोलीत आलो असेन. मी ऐकलं की इथे एक बाई आजारी आहेत. म्हटलं, इन्शुरन्स... अशा वेळी माणसाला काळजी वाटते ना?”
“मला इन्शुरन्स नको,” मी म्हणाले.
“नको, नको. मी काही विकायला नाही आलो. फक्त... इथे जवळ बसू का?”
मी उत्तर दिलं नाही. तो बसला. खुर्चीच्या काठावर. जणू कधीही उठून जायचं असेल.
“या भागात तुम्ही खूप लोकांना ओळखत असाल,” तो म्हणाला.
“सगळ्यांना ओळखते.”
“हेन्री रोआन, ते तुमचे...”
“माझे पहिले पती.”
“अच्छा.” तो थोडा थांबला. “त्यांचा इन्शुरन्स होता असं मी ऐकलं. कुणाच्या नावावर होता, माहीत आहे का?”
मला त्या क्षणी हेन्रीचा चेहरा आठवला. त्या कागदाचं नाव त्यानं मला सांगितलं होतं. आणि मी ते अर्नेस्टलाही सांगितलं नव्हतं.
“मला माहीत नाही,” मी म्हणाले.
त्यानं मान हलवली. विचित्र गोष्ट अशी की त्याला उत्तर पटल्यासारखं वाटलं नाही आणि तो चिडलाही नाही.
“ठीक आहे,” तो म्हणाला. “तुम्ही लवकर बऱ्या व्हा.”
तो गेला. त्याचं नाव विचारायचं राहिलं, हे मला नंतर आठवलं.
* * *
दुसरा पाहुणा गुरांचा व्यापारी होता. तो हॉस्पिटलमध्ये नाही आला. तो आमच्या घराजवळ आला.
मी तेव्हा अधून मधून घरी जाऊन येत होते. दोन तीन तासांसाठी. डॉक्टर म्हणाले होते, “थोडं फिरून या, मुलांना बघा.”
तो आमच्या कुंपणाजवळ उभा होता. त्याचा घोडा बाजूला बांधलेला. बूट मातीनं माखलेले. गळ्यात फडकं.
“मॅडम, तुमच्या शेजारी जमीन विकायची आहे असं ऐकलं. गुरं ठेवायला जागा हवी होती.”
“शेजारी मला काही बोलले नाहीत.”
“अच्छा. तुम्ही कुठल्या?”
“मी इथलीच.”
तो हसला. “इथल्या सगळ्या बाया असंच म्हणतात. पण घराघरात वेगळी गोष्ट असते.”
“तुम्ही बाहेरचे दिसता.”
“टेक्सासचा आहे.”
मिस्टर हेलही टेक्सासचे होते. मी हे त्याला म्हटलं नाही, पण त्याला कळलं असावं, कारण त्यानं एकदम विषय बदलला.
“तुमची मुलं?”
“आत आहेत.”
“सुंदर घर आहे. कुणी बांधलं?”
“अर्नेस्टनं. आणि त्याच्या काकांनी मदत केली.”
“काका म्हणजे... हेल?”
“हो.”
त्यानं माझ्याकडे सरळ बघितलं नाही. घोड्याच्या गळ्यावर हात फिरवत राहिला.
“चांगले लोक असतील,” तो म्हणाला.
मी काही बोलले नाही. घरात गेले. पण खिडकीतून बघितलं तर तो तिथेच उभा राहून घराकडे पाहत होता, जणू कोणीतरी त्याला काहीतरी सांगितलं असावं.
* * *
मला तेव्हा ते सगळे फक्त पाहुणे वाटत होते, आता कळतं ते कोण होते, पण तेव्हा गावात नवे चेहरे रोज दिसायला लागले होते आणि कुणी कुणाला विचारत नव्हतं, एखादा दुकानात येऊन कॉफीचा भाव विचारायचा आणि मग तासन्तास बाकावर बसून राहायचा, मिसेस पीटरसनची गाय त्याच आठवड्यात आजारी पडली आणि त्या गायीचीच चर्चा जास्त झाली, असं माझ्या लक्षात आहे, एक माणूस रस्त्याच्या कडेला घोड्याला चारा देत होता, तेवढ्या वेळात चारा संपला असता, तरी तो देतच होता, आणि गावातली कुत्री त्यांच्यावर भुंकत नव्हती, हे मला विचित्र वाटलं.
मिस्टर हेल मात्र रोज येत होते.
ते आता जास्तच बोलायचे, आणि जास्तच हसायचे.
“मॉली, तू बरी हो. आम्ही सगळे तुझ्यासाठी प्रार्थना करतोय.”
“धन्यवाद, काका.”
“हे बाहेरचे लोक आलेत ना, ते काही चांगलं करत नाहीत. त्यांच्याशी फार बोलू नकोस.”
“कोण बाहेरचे?”
त्यांनी एक क्षण माझ्याकडे बघितलं. डोळे हसत होते का, हे मला आजही माहीत नाही.
“फेडरल लोक,” ते म्हणाले. “वॉशिंग्टनचे. तुम्हा लोकांच्या प्रश्नात नाक खुपसायला येतात. आणि जेव्हा जातात, तेव्हा सगळं आधीपेक्षा वाईट करून जातात.”
“मग आपण काय करायचं?”
“काही नाही. गप्प राहायचं. आपलं आपण पाहायचं.”
त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. जसं लहानपणी चर्चमध्ये फादर ठेवतात.
* * *
अर्नेस्ट त्या दिवसांत बदलला.
सुरुवातीला मला वाटलं, तो माझ्या आजारपणामुळे थकला आहे. त्याचे डोळे खोल गेले होते, गाल बसले होते. तो कमी बोलायचा. जेवताना प्लेट पुढे असायची आणि तो चमचा हातात धरून भिंतीकडे बघत बसायचा.
एका रात्री मी उठले तर तो पलंगावर नव्हता. मी चाचपडत बाहेर गेले. तो स्वयंपाकघरात खुर्चीवर बसला होता. अंधारात. हातात पेला.
“काय करतोयस?”
तो चमकला. पेला जवळजवळ खाली पडला.
“काही नाही. झोप येत नव्हती.”
“हे काय पितोयस?”
“पाणी.”
मला वास आला नाही. पण मला माहीत होतं, ते पाणी नव्हतं.
“अर्नेस्ट...”
“झोप तू,” तो म्हणाला. त्याचा आवाज वेगळा होता. कुणीतरी दुसरा माणूस बोलावा तसा.
मी गेले. पण झोपले नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्याच्या कोटाचे खिसे पाहिले. मला कारण सांगता येणार नाही. कुणीतरी माझ्या आत सांगत होतं. खिशात काही नव्हतं, फक्त एक गुंडाळलेला रुमाल. रुमाल ओलसर होता. त्यानं तो घाम पुसायला वापरला असेल.
मी तो परत जागेवर ठेवला.
* * *
त्या आठवड्यात तिसरा पाहुणा आला.
तो माझ्या आईच्या काळातल्या माणसासारखा दिसत होता. ओसेज नव्हता, पण ओसेजसारखा बोलायचा. हळू. शब्द मोजून. त्याच्या हातात एक कापडी बॅग होती, त्यात वाळलेली मुळं.
“आजी, मी औषध विकतो,” तो म्हणाला. मला आजी म्हटलं, तेव्हा मला हसू आलं. मी चाळीसची पण झाले नव्हते.
“मी आजी नाही.”
“माफ करा. आपल्या लोकांत... बाईला आदरानं तसं म्हणतात.”
“तुम्ही आपल्या लोकांतले?”
तो हसला. “नाही. पण शिकलो.”
मी त्याच्याकडे नीट बघितलं. त्याच्या डोळ्यांत काही होतं. खोटं नाही. थकवा असेल. किंवा भीती.
“तुम्हाला साखरेचा त्रास आहे, मी ऐकलं,” तो म्हणाला.
“कुणी सांगितलं?”
“सगळ्यांना माहीत आहे.”
खरं होतं. आमच्या गावात सगळ्यांना सगळं माहीत असतं.
त्यानं बॅगमधून एक पाकीट काढलं. “हे चहात टाकून प्या. झोप नीट लागेल.”
मी पाकीट घेतलं नाही.
“मी घरी जे देतात तेच खाते,” मी म्हणाले. “दुसरं काही नाही.”
त्यानं पाकीट परत ठेवलं. कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. फक्त हळू म्हणाला, “तेच बरं.”
आणि मला कळलं की ही त्याची परीक्षा होती. मी कसं उत्तर देते, ते बघायला. उत्तर काय हवं होतं, ते मला समजलं नाही, पण त्याला ते मिळालं असावं. कारण त्यानं पुन्हा बॅग बांधली आणि जाताना म्हणाला,
“ठीक आहे,” तो म्हणाला, आणि बॅग खांद्यावर टाकली. दारात थांबून म्हणाला, “तुम्ही सावध राहा.”
“कशाबद्दल?”
त्यानं उत्तर दिलं नाही. मी पायरीपर्यंत गेले तर तो रस्त्याच्या वळणावर दिसेनासा झाला होता.
* * *
पाहुणे रोज येत होते असं नाही. आठवड्यातून दोन तीन. दुकानात, चर्चबाहेर, रस्त्यावर. मी त्यांच्याशी बोलले नाही, त्यांनी माझ्याशी जबरदस्ती केली नाही. ते आले, उभे राहिले, काहीतरी विचारलं आणि गेले.
एकदा मी हॉस्पिटलच्या बागेत बसले होते. एक उंच माणूस बाकावर येऊन बसला. त्यानं कुणाकडे बघितलं नाही. कुठलाही अभिवादन नाही.
मी दुसऱ्या टोकाला होते. आम्ही दोघं समोर बघत होतो, जणू एकमेकांना ओळखत नाही.
“तुमच्या पतीचे काका,” तो अचानक म्हणाला, “तुमच्यावर खूप प्रेम करतात असं सगळे सांगतात.”
मी काही बोलले नाही.
“ते तुमच्या बहिणींवरही प्रेम करत होते असं सांगतात.”
मी हात घट्ट केले.
“तुम्हाला कधी वाटलं का, बाई, की एकाच कुटुंबाला इतकं दुर्दैव येत नाही?”
“मला काही म्हणायचं नाही,” मी म्हणाले. माझा आवाज मला ऐकू आला. तो पातळ होता, कापडासारखा.
“मला समजतं.”
“मग का विचारता?”
“कारण आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. आणि कारण तुम्ही सुरक्षित नाही.”
“मी इथे आहे. हॉस्पिटलमध्ये.”
“हो.” तो थोडा थांबला. “आणि घरी जाता तेव्हा?”
मी उत्तर दिलं नाही. मला उत्तर माहीत होतं. म्हणूनच दिलं नाही.
तो उठला, कोटाची कॉलर नीट केली.
“आम्ही इथेच आहोत,” तो म्हणाला. “लोकांना वाटतं आम्ही गेलो, पण आम्ही नाही गेलो. तुम्हाला काही सांगावंसं वाटलं तर...”
“मला काही सांगायचं नाही.”
“ठीक आहे.”
तो गेला. आणि मी बराच वेळ तिथेच बसून राहिले. बागेत एक छोटं पक्ष्याचं पिल्लू बाकाखाली चालत होतं. मी त्याला बघत राहिले, कारण दुसरं काही बघवत नव्हतं.
* * *
त्या रात्री अर्नेस्ट भेटायला आला. तो उशीरा आला. बाहेर थंड वारा होता, आणि त्याच्या कोटावर धुळीचा वास होता.
तो खुर्चीत बसला आणि बराच वेळ बोलला नाही.
“आज कुणी आलं होतं का?” त्यानं विचारलं.
“कोण येणार?”
“कुणीही. बाहेरचे.”
“डॉक्टर आले. नर्स आली.”
“आणि कुणी?”
मी त्याच्याकडे पाहिलं. तो माझ्याकडे बघत नव्हता. तो माझ्या पांघरुणाकडे बघत होता.
“एक माणूस होता,” मी म्हणाले. “बागेत.”
त्याचे खांदे ताठ झाले.
“काय म्हणाला?”
“पावसाबद्दल बोलला.”
“पावसाबद्दल?”
“हो. म्हणाला, या वर्षी लवकर थंडी पडेल.”
तो बराच वेळ माझ्याकडे बघत राहिला. मग त्यानं मान हलवली.
“बरं,” तो म्हणाला. “काळजी घे.”
तो उठला आणि माझ्या कपाळावर ओठ टेकवून गेला.
तो गेल्यावर मी तशीच पडून राहिले. खिडकीतून झाड दिसत होतं. उद्याचा डोस किती आहे, ते नर्सला विचारायचं मी ठरवलं.
* * *
भाग ९ : कबुली
जानेवारीत बर्फ पडला. हॉस्पिटलच्या खिडकीतलं झाड पांढरं झालं.
मी तेव्हा थोडी उठून बसू लागले होते. डॉक्टर बदलले होते. कुणी बदललं, का बदललं, मला कुणी सांगितलं नाही. फक्त एके दिवशी सकाळी एक नवी नर्स आली आणि म्हणाली, “आजपासून तुमची औषधं मी देईन.” मी विचारलं नाही.
अर्नेस्ट रोज यायचा. पण त्या आठवड्यात तो आला नाही. एक दिवस. दोन दिवस. मला वाटलं, मुलांना सांभाळतोय.
तिसऱ्या दिवशी सकाळी एलिझाबेथ आली. मिसेस पीटरसन तिला घेऊन आल्या होत्या. तिच्या चेहऱ्यावर काहीतरी होतं. मुलं जेव्हा काहीतरी लपवत असतात, तसं.
“आई, बाबा कुठे आहे?”
“तुला माहीत नाही?”
“लोक म्हणतात, बाबाला नेलं.”
“कुणी नेलं?”
तिनं मान खाली घातली. “पोलिसांनी.”
मी मिसेस पीटरसनकडे बघितलं. त्या भिंतीकडे बघत होत्या.
“काय झालं?”
“मॉली...” त्या हळू म्हणाल्या. “तुला डॉक्टरांनी सांगितलं नाही का?”
“काय?”
“अर्नेस्टला आणि हेलला पकडलं. रिटा आणि बिलच्या प्रकरणात.”
मला काही ऐकू आलं नाही. म्हणजे ऐकू आलं, पण कानापर्यंत पोचलं नाही. जसं खोल पाण्यात कुणी बोलत असतं.
“मिस्टर हेल?” मी विचारलं.
“ते दोघांनाही.”
“पण मिस्टर हेल यांना तर... त्यांनी वचन दिलं होतं...”
मी वाक्य पूर्ण करू शकले नाही. एलिझाबेथ माझ्याकडे बघत होती. मी तिचा हात धरला आणि म्हणाले, “जा, बाहेर खेळ.”
“बाहेर बर्फ आहे.”
“मग बर्फात खेळ.”
ती गेली.
* * *
नंतर मला बाकीचं कळत गेलं, तुकड्या तुकड्याने.
वॉरंट जानेवारीच्या सुरुवातीला निघालं होतं. अर्नेस्टला लगेच पकडलं. मिस्टर हेल काही दिवस सापडले नाहीत; मग स्वतःच आले. कुणी म्हणालं ते गावातच होते. कुणी म्हणालं ते पळायच्या तयारीत होते. मला काही माहीत नाही.
अर्नेस्टला तुरुंगात ठेवलं होतं. काही दिवस तो काही बोलला नाही. मग त्याच्यासमोर एक माणूस आणला. ब्लॅकी थॉम्पसन नावाचा. गुन्हेगार. तो म्हणाला, अर्नेस्ट आणि हेल यांनी त्याला पैसे देऊन एक काम करायला सांगितलं होतं. त्याने नकार दिला होता.
कुणी मला सांगितलं की त्या माणसाकडे बघून अर्नेस्टचा चेहरा पांढरा पडला.
आणि मग अर्नेस्ट बोलला.
मी जे ऐकलं ते न्यूजपेपरमध्ये वाचलं. वकिलाने समजावून सांगितलं. मी स्वतः ऐकलं नाही, कारण मी तिथे नव्हते. पण मी ते शब्द शंभर वेळा वाचले.
मिस्टर हेल यांनी ग्रॅमर नावाच्या माणसाला सांगितलं की एक माणूस शोध, ज्याला असं काम जमेल. त्याचं नाव कर्बी. आणि मग एका रात्री अर्नेस्टने कर्बीला जाऊन सांगितलं, आता वेळ झाली आहे.
कुठली वेळ?
रिटाच्या घराची.
* * *
हे मला मान्य करायला किती वेळ लागला, ते मी सांगू शकत नाही.
मी न्यूजपेपर हातात धरून बसले होते. वाचलं, घडी केली, पुन्हा उघडलं. नर्सने येऊन विचारलं, “मॅडम, काही हवंय?”
“नाही.”
“तुम्ही बराच वेळ तेच पान बघताय.”
“हो.”
तिने ते माझ्या हातातून घेतलं नाही. फक्त पाणी भरून ठेवलं आणि गेली.
मला रडू आलं नाही. मला खूप वेळ हसू आलं. नंतर काय झालं, ते माहीत नाही. पण मला आठवतं, मी हसत होते आणि माझ्या छातीत काहीतरी आवळत चाललं होतं. जसं कुणी ओला रुमाल पिळतं.
पाच वर्षं मी त्याला आपल्या घरातला माणूस म्हणून पाहिलं. त्यानं माझ्या मुलांना जन्मताना उचललं. त्यानं माझ्या आईच्या अंत्ययात्रेत लँटर्न धरला. तो रिटाच्या घरात ढिगाऱ्यातून काम करत होता. काय शोधत होता? रिटाला? की काही उरलं आहे का, ते?
मला हे कधीच कळणार नाही.
* * *
मी अर्नेस्टला भेटायला गेले. मार्च महिन्यात, जेव्हा मला चालता यायला लागलं.
मला आजही प्रश्न विचारतात, “तुम्ही का गेलात?”
मला उत्तर माहीत नाही. कदाचित मला त्याच्या तोंडून ऐकायचं होतं. कदाचित मला ते सगळं स्वतःला पटवून द्यायचं होतं. कदाचित मला त्याचा चेहरा बघायचा होता.
एका छोट्या खोलीत भेट ठरली. मध्ये लाकडी टेबल. गार्ड दारात उभा.
अर्नेस्ट आधीच बसला होता. तो बारीक झाला होता. केस विस्कटलेले. दाढी वाढलेली. त्याने मला पाहिलं आणि उठून उभा राहिला.
“मॉली.”
मी बसले. तो बसला नाही.
“बस,” मी म्हणाले.
तो बसला.
बराच वेळ आम्ही काही बोललो नाही. गार्डच्या बुटांचा आवाज येत होता. तो मागेपुढे चालत होता.
“मुलं कशी आहेत?” त्यानं विचारलं.
“मिसेस पीटरसन बघतात.”
“एलिझाबेथ...”
“तिला माहीत आहे.”
तो डोळे मिटून बसला.
“मी तुला एक विचारायला आले,” मी म्हणाले.
“विचार.”
“रिटा.”
तो काही बोलला नाही.
“तू केलंस?”
“मी... मी ते जाऊन सांगितलं. मी स्वतः काही... मॉली, मला वेळ दे, मी...”
“हो किंवा नाही.”
“मी त्याला सांगितलं,” तो म्हणाला. “वेळ झाली आहे.”
मी ते वाक्य ऐकलं. न्यूजपेपरमध्ये वाचलं होतं, पण ऐकणं वेगळं होतं. त्याच्या आवाजात.
“आणि मी?” मी विचारलं.
तो माझ्याकडे बघू लागला. त्याच्या डोळ्यात काही शब्द येऊ पाहत होते, पण ओठांपर्यंत आले नाहीत.
“मॉली...”
“मला दर आठवड्याला कुणीतरी इंजेक्शन द्यायचं. तू मला गाडीतून न्यायचास. तू मला कॉफी आणायचास.”
“मी तुला कधीच...”
“अर्नेस्ट.”
तो गप्प झाला.
मी ओरडणार नाही, असं ठरवून आले होते. आणि मग मी ओरडले. गार्ड दारातून आत डोकावला. अर्नेस्टनं त्याला हातानं इशारा केला, ठीक आहे, ठीक आहे. मला माझ्या ओरडण्याला त्यानं परवानगी द्यावी, हे आणखी असह्य झालं.
“तू माझ्यासाठी रोज कॉफी आणलीस. ती मी प्यायले. तू माझ्याकडे बघत राहायचास.”
“हो.”
“का बघायचास?”
तो उत्तर देत नव्हता. टेबलाकडे बघत होता.
मला उत्तराची गरज नव्हती. मी हे ओळखलं होतं. त्या रात्री, हॉस्पिटलमध्ये, जेव्हा त्यानं थर्मास काढला होता आणि मी अर्धी कॉफी गार होऊ दिली होती. तेव्हाच.
“मी तुझ्यावर प्रेम केलं,” तो शेवटी म्हणाला. आवाज फाटला होता. “मी खरंच केलं. ते खोटं नव्हतं.”
“मला माहीत आहे,” मी म्हणाले.
तो चमकला. त्याला वाटलं असेल मी रागावेन. किंवा ओरडेन. किंवा माफ करेन.
“मला माहीत आहे,” मी पुन्हा म्हणाले. मग मला काय बोलावं सुचेना, आणि मी म्हटलं, “तुझ्या शर्टचं बटण चुकलंय.”
तो खाली बघू लागला. खरंच चुकलं होतं.
मी उठले. गार्डने दार उघडलं.
“मॉली!”
मी वळले नाही.
“मॉली, एलिझाबेथला सांग की मी...”
“तू स्वतः सांग,” मी म्हणाले. “जेव्हा ती मोठी होईल.”
दार बंद झालं. बाहेर वारा होता. मी पायरीवर बसले. पाय थरथरत होते. शेजारून एक गोरा माणूस जात होता. त्याने माझ्याकडे बघितलं आणि टोपी हलकी वर केली. मला का, ते कळलं नाही. बहुधा मी रडत होते आणि मला स्वतःला कळलं नव्हतं.
* * *
अॅनाला खोकला लागला होता.
सुरुवातीला मला वाटलं साधा खोकला. थंडी होती, मुलांना होतात. पण तो वाढला. रात्री ती एका दमात इतका खोकायची की चेहरा निळा पडायचा. आणि मग शेवटी एक विचित्र आवाज यायचा, ओढून घेतल्यासारखा. जसं कुणी पाण्याखालून वर येतंय.
डॉक्टर म्हणाले, डांग्या खोकला.
मी तेव्हा पूर्ण बरी झाले नव्हते. हात इतके कमजोर की तिला उचलताना थरथरायचे. मिसेस पीटरसन रात्र रात्र बसून राहायच्या. एलिझाबेथ तिला गोष्टी सांगायची. जेम्स स्वतःची खेळणी तिच्या पलंगावर आणून ठेवायचा.
एका रात्री ती म्हणाली, “आई, तळ्यावर कधी जाणार?”
“लवकरच.”
“तू म्हणालीस, बरी झालीस की.”
“हो ग. बरी झाले की.”
“मग आता झालीस ना?”
मी तिचा चेहरा बघितला. ती तीन वर्षांची होती, चार व्हायची होती. केसांवर घाम चिकटलेला. तिनं माझ्याकडे आशेनं बघितलं.
“जवळजवळ,” मी म्हणाले.
ती हसली. आणि पुन्हा गुणगुणायला लागली. शब्द नव्हते.
सकाळी ती तशीच झोपलेली होती. गुणगुणं थांबलं होतं.
मला कुणी काही सांगायची गरज नव्हती. मी आता हे ओळखायला शिकले होते. घरात इतकी शांतता कधी नसते.
तिला मी आईच्या शेजारी पुरलं. आमच्या सिमेटरीत, ओसेज प्रार्थनांसह. गावातल्या वृद्ध बायका येऊन माझ्या शेजारी उभ्या राहिल्या. कुणी काही बोललं नाही. जेम्सने माझ्या स्कर्टचा काठ घट्ट धरला होता.
त्या दिवशी मला दोन गोष्टी वाटल्या. अर्नेस्ट इथे असता तर बरं झालं असतं. आणि तो इथे नाही, हेही बरंच झालं. दोन्ही सारख्याच जोरात वाटत होत्या आणि मी कुणालाच सांगितलं नाही.
* * *
मे महिन्यात एक वकील मला भेटायला आला. आणखी एक. माझ्या आयुष्यात आता वकिलांचीच गर्दी होती.
तो एक कागद घेऊन आला होता.
“मिसेस बर्कहार्ट, तुम्ही डिव्होर्ससाठी फाइल करू शकता. या परिस्थितीत कोर्ट लवकर मान्य करेल.”
“डिव्होर्स?”
“हो. तुमचे पती... तुम्ही स्वतःला आणि मुलांना त्यांच्यापासून वेगळं करू शकता.”
“आणि जर मी केलं नाही तर?”
त्याने नीट विचार केला. “तुम्हाला आर्थिक अडचण येणार नाही. तुमचा हेडराईट तुमच्याच नावावर आहे. पण...”
“पण?”
“लोक काय म्हणतील, हे तुम्ही बघा.”
मी त्याच्याकडे बघितलं. आमच्या गावात तेव्हा लोक सगळंच बोलत होते. आता आणखी काय म्हणणार?
“कागद द्या,” मी म्हणाले.
त्याने दिला. मी पान उलटलं. मजकूर लहान अक्षरात होता.
“मी वाचून देऊ?” त्याने विचारलं.
मला अर्नेस्टचे शब्द आठवले. मी वाचून देतो तुला. तुझे डोळे दुखतात ना.
“नाही,” मी म्हणाले. “मी वाचेन.”
त्यानं पेन दिलं. मी चष्मा लावला. एक एक ओळ वाचली. शब्दन् शब्द. पहिल्यांदा, खरंच, काय लिहिलंय ते.
मग मी सही केली.
फी भरायची राहिली होती. पुढच्या आठवड्यात मी ती स्वतः जाऊन भरली, आणि येताना एलिझाबेथसाठी बुटांचे फिते घेतले. जुने तुटले होते.
* * *
भाग १० : नंतर
आता मी हे सगळं सांगते आहे, तर ते माझ्या घरातलं नाही असं वाटतं. जसं आपण दुसऱ्या कुणाबद्दल बोलतोय.
मिस्टर हेल यांच्यावरचा खटला पहिल्यांदा १९२६ च्या शेवटी झाला. ऑक्टोबरमध्ये त्यांना आणि रॅमसी नावाच्या माणसाला गिल्टी ठरवलं. मला वकिलाने बातमी दिली. मी स्वयंपाकघरात होते.
“तुम्हाला काही वाटतं का?” त्यानं विचारलं.
“मला जरा बसायचंय,” मी म्हणाले.
मी बसले. मग उठून पाणी प्यायले.
काही महिन्यांनी तो पुन्हा आला. निकाल रद्द झाला होता. खटला चुकीच्या कोर्टात चालला होता, कायद्यानं तो दुसऱ्या जागी व्हायला हवा होता. मला कारण कळलं नाही. वकिलानं तीन वेळा समजावलं आणि मी तीन वेळा मान हलवली.
“म्हणजे सगळं पुन्हा?”
“हो. पुन्हा.”
“सगळे पुन्हा बोलणार?”
“हो.”
मी खिडकीबाहेर बघितलं. एलिझाबेथ आणि जेम्स यार्डमध्ये खेळत होते. एलिझाबेथ आठ वर्षांची झाली होती. ती आता जास्त बोलत नव्हती. सगळं ऐकत होती.
“ठीक आहे,” मी म्हणाले. “पुन्हा.”
* * *
१९२८ मध्ये मी जॉन कॉबशी लग्न केलं.
या बद्दल मला फार काही सांगता येत नाही. तो चांगला माणूस होता. शांत. त्याचा आवाज हळू होता. आणि तो घोरायचा. पहिल्या रात्री मी जागी झाले आणि वाटलं पुन्हा कुणी काही उडवलं. मग कळलं की तो घोरतोय. आम्ही दोघं सकाळी त्यावर हसलो. आणि त्यानं माझ्यासाठी कधी कॉफी केली नाही. मी त्याला करू दिली नसती.
लोक विचारतात, तुम्हाला भीती नाही वाटली?
वाटली. माझी भीती आता आदत झाली आहे. मी जेवण स्वतः करते. पाणी स्वतः भरते. कुणी काही आणलं तर मी आधी स्वतः चव घेते, मुलांना नाही देत. जॉननं मला कधी विचारलं नाही, का. त्यानं फक्त एका दिवशी स्वयंपाकघरात येऊन माझ्या जवळ कांदे चिरले आणि म्हणाला, “मी काहीही खायला तयार आहे. पण तू केलेलं.”
एवढंच. तेवढं पुरलं.
* * *
१९२९ मध्ये मिस्टर हेल यांचा दुसरा खटला झाला.
मी त्याला गेले. एकदाच. मागच्या रांगेत बसले.
कोर्टाची खोली मोठी होती, लाकडी भिंती, वर पंखे. गर्दी होती. गोरे लोक, आमचे लोक. बायका शालीत गुंडाळलेल्या. पुरुष टोप्या हातात धरलेले. कोणी कोणाशी बोलत नव्हतं.
मिस्टर हेल आत आले, दोन गार्ड्सच्या मध्ये. त्यांनी चांगला सूट घातला होता. बारीक झाले होते. केस पांढरे. पण चालताना मान ताठ होती, जशी नेहमी असायची.
मी जिथे बसले होते, तिथून त्यांचा चेहरा तिरका दिसत होता.
ते एकदा मागे बघतील, असं मला वाटलं होतं. त्यांनी बघितलं नाही.
मला त्यांच्याकडे काहीतरी फेकून मारायचं होतं. हातात पर्स होती, तीच फेकली असती. पण मी मागच्या रांगेत होते आणि ते खूप लांब होते. पर्स त्यांच्यापर्यंत गेलीही नसती. मी ती मांडीवर घट्ट धरून बसले.
त्यांनी एकदाही सगळ्यांकडे नजर फिरवली नाही. फक्त समोर. जणू हे सगळं त्यांच्यासाठी नाहीच.
मी तिथे बसून त्यांचे शब्द ऐकले, जे विटनेसेस म्हणत होते. रात्री कसं घडलं. काय सांगितलं. कुणी कुणाला काय दिलं. रक्कम, तारखा, नावं. नावं ओळखीची होती. माझ्या आईचं नाव येताच मी हात घट्ट केले. मग तेही मागे पडलं आणि बोलणं पुढे गेलं. मला हलकं आश्चर्य वाटलं, की सगळं इतक्या सहजपणे सांगता येतं.
माझ्या बहिणींचे मृत्यू तिथे फक्त तारखा आणि रकमा होते. त्यांचं हसणं नव्हतं, त्यांचे हात थंड होणं नव्हतं, कुणी कुणाला शेवटचं काय म्हटलं, तेही नव्हतं.
मी निघून आले. निकाल मला वकिलाने सांगितला. गिल्टी. लाइफ सेंटेन्स.
रॅमसीलाही त्याच वर्षी. आणि माझ्या अर्नेस्टला तर आधीच. आता मी त्याला “माझा अर्नेस्ट” म्हणत नव्हते, पण ती सवय मोडायला वेळ लागला.
* * *
सगळ्यात विचित्र गोष्ट अशी की हे सगळं संपल्यावरही काही संपलं नाही.
माझ्या बहिणी परत आल्या नाहीत. अॅना, मिनी, रिटा, आई. त्यांच्या नावावरचा हेडराईट माझ्याकडे आला. मला तो नको होता. मला काहीच नको होतं. पण तो होता, आणि लोक त्याबद्दल बोलत राहिले.
म्हणजे मी जिवंत होते, पण कायद्यानं मला स्वतःचे पैसे सांभाळता येत नव्हते. ते अजूनही माझ्या गार्डियनकडे होते. तोच, ज्याचं नाव आमच्या आईच्या वेळी कागदावर आलं होतं. त्यानं माझ्याकडे बघितलं तरी नाही, पण तो माझ्या पैशावर सही करायचा.
१९३१ मध्ये मी कोर्टात गेले आणि सांगितलं, मला आता ते मान्य नाही.
वकील घाबरला. “तुम्ही खात्री करताय?”
“मी इतकी वर्षं थांबले,” मी म्हणाले. “किती थांबायचं हे कुणी सांगितलं नव्हतं. आता मी ठरवते.”
जजनी कागद बघितले. माझ्याकडे बघितलं. मला वाटलं ते काहीतरी विचारतील. त्यांनी फक्त विचारलं, “तुम्हाला आता हे सांभाळता येईल असं तुम्हाला वाटतं का, मिसेस कॉब?”
“मी तीन मुलांना सांभाळलं,” मी म्हणाले. “दोघं उरलेत. एक गेलं.”
कोर्टात सगळे गप्प झाले.
त्यांनी रुलिंग दिलं. आता मी माझ्या पैशाची मालकीण होते.
बाहेर आल्यावर वकिलानं हात पुढे केला. मी तो हातात घेतला आणि सोडला. मग आम्ही दोघं गाडीपर्यंत गप्प चालत गेलो.
* * *
आज मी स्वयंपाकघरात उभी आहे. बाहेर पाऊस पडतोय. घराच्या छपरावर पाण्याचे थेंब सारखे आवाज करतात, पण आता मला भीती वाटत नाही. पावसाला मी घाबरत नाही.
एलिझाबेथ आता मोठी झाली आहे. ती वाचते, लिहिते. जेम्स घोडे चालवतो, आणि गावातल्या मुलांना हसवतो. दोघंही मला विचारतात, “आई, तू कधी सांगणार आहेस आम्हाला सगळं?”
मी म्हणते, “सांगेन.”
ही कथा मी त्यांना सांगितली नाही. ती इथे लिहिली आहे. ते वाचतील, कधी तरी.
मी मिस्टर हेल यांना माफ केलेलं नाही. अर्नेस्टलाही नाही. काही लोक म्हणतात, माफ करायला हवं. मला जमलं नाही. कदाचित जमेल. आज नाही.
पण मी रोज सकाळी कॉफी करते. कधी कधी जळतेच.
आज एलिझाबेथ स्वयंपाकघरात आली. शाळेचं पुस्तक बाजूला ठेवलं.
“आई, मी करू?”
“ठेव, मी करते.”
तिनं आग्रह केला नाही. बसली आणि माझ्याकडे बघत राहिली.
मी कॉफी गाळली. पण पावसाकडे बघता बघता ती जरा जास्त उकळली.
एलिझाबेथने एक घोट घेतला.
“आई, जळली.”
मी शाल खांद्यावर ओढली.
“जळली तर जळली. गरम आहे ना?” मी म्हणाले. “पी.”
तिनं कपाकडे बघितलं. आणि पिऊन टाकली. अख्खी.
“उद्या मी करू?” तिनं विचारलं.
“उद्या बघू,” मी म्हणाले.
No comments:
Post a Comment